Tuesday, November 11, 2008

बुडबुडे

कधी कधी आपले विचार म्हणजे शब्दांचे केवळ बुडबुडे असतात किंबहुना आपल्या नकळत ते बऱ्याचदा तसेच असतात. जितके त्या शब्दांचे वजन कमी-जास्त तितकेच त्याचे बुडबुडे लहान-मोठे असतात.

बुडबुडे ह्याचसाठी म्हणतोय कारण त्या शब्दांत साठलेले अनुभव, चिंतन, त्यातील कल्पनाविलास आणि त्याचा अर्थ हे सारे जोपर्यंत एखादी व्यक्ती तो विचार करीत असते किंवा ऐकत असते तोपर्यंतच त्याची मजा असते, त्याचे अस्तित्व असते. एकदा का तो त्या विचारातुन बाहेर पडला कि त्या विचारांचा तो बुडबुडा फुटतो.

असे बऱ्याचदा होते. बरेचजण बराच विचार करतात आणि त्या विचारांना ईतर विचारांच्या फांदया अकारण जोडत जातात. पण त्यांच्या दॄष्टीने एखादया विषयावर चिकटुन राहने म्हणजे इतर बुडबुडयांची मजा हरवुन बसने.

हे रंगी बेरंगी, अनेकविध आकारांचे, विचारांचे बुडबुडे ज्याला काढता आले तो जादुगार बनतो आणि ज्याला ते जमले नाही तो विंगेतला प्रेक्षक बनतो. तिथे बसुन चकित होण्यात आणि हि सारी मजा न्याह्याळण्यात पण एक मजा आहेच, परंतु प्रेक्षक बनुन ते बुडबुडे स्वत:हुन फुटण्याची वाट बघण्यापेक्षा जर लहान बनुन तेच बुडबुडे आपण फोडू लागलो तर जी मजा अनुभवता येईल ती कल्पनातीत असेल.

काय माहित? अशीच फोडा-फोडी करता-करता अजुन काहि नवीन बुडबुडे तयार होतील. कधी ते एकमेकांशी खेळ मांडतील, कधी एकमेकांच्या विरुध्द पळतील तर कधी दोन समविचारी एकमेकांमध्ये विरघळुन जातील. त्यातुनच मग एखादा नवीन परिपक्व विचारांचा बुडबुडा तयार होईल. एखादा खूप उंच उडेल नाहितर एखादया कमजोर विचाराचे तिथेच पाणी-पाणी होईल.


मात्र त्यातले काही खूप वेळ टिकुन राहतील अजुन एका बुडबुडयाची वाट पाहीत.



- समीर पाटिल (२६ जानेवारी. २००४)

Friday, November 07, 2008

आभाळ

मी आभाळ शोधत बसलेलो आणि सोबत माझे शेत काळेठक्कर रंगुन पडलेले. जमिनीचे पापुद्रे आपापली पाठ शेकीत कंटाळून पालथे झालेले. तेवढ्यात ती आली. कुठून? कधी? काही कळालेच नाही. तिला पहाताच माझ्या शुश्क पापण्या थंडावल्या. कधीची रुतुन बसलेली बिजे आता रुजुन वर आलेली. ती देखिल तिचीच वाट पहात होते बहुतेक. पाहता-पाहता माझे शेत तयार झाले. वारयावरती झुलु लागले.

असंख्य पाखरे माझ्या शेतावर झुंबड करु लागली. त्यांचा उपवास मिटलेला! ईवल्याश्या चोचींनी केलेला त्यांचा तो किलबिलाट मला आता आवडु लागलेला. ती पाखरेदेखिल तिचीच गाणी गात होती, मी त्यांना उडवु एछ्छित नव्ह्तो. त्या पाखरांचे असने म्हणजे तिच्या अस्तित्वाची प्रत्येक क्षणी होणारी जाणीव होती.

----------

त्यादिवशी ती निघाली तेव्हा सारे शेत शांत झालेले. मग माझ्याच शेतात मलाही राहवेना. सारे शेत भरलेले तरिहि त्या रात्रिच्या चांदण्याप्रमाणे विखुरलेले. ती रात्र तशीच गेली, उदासवाणी.

----------

अपेक्षा नसताना देखील दुसरया दिवशी ती आली आणि आदल्या दिवशीचा खेळ पुन्हा एकदा रंगुन आला. मग तिचे येणे-जाणे नियमीत झाले. ती निघताना पाखरे मुकपणे रडायची आणि ती आली की मनापासुन खेळायची. माझ्या शेताला, त्यावर झुंबडनारया त्या पाखरांना, आणि मला आम्हा सर्वांना आता तिची सवयच होवुन गेली. ती देखिल नेहमी जाताना उद्या नक्की येण्याचे शब्द देवु लागली.

----------

सगळे स्वप्नवत आता प्रत्यक्षात घडु लागलेले. फुले उमलु लागली आणि अंगणात सडा बनुन पसरू लागली. ती एक-एक फुल गोळा करुन मला देवु लाग्ली. मी ती फुले एका दोरीत ओवु लागलो, त्या फुलांचा हार तिला देण्याची आस मनात ठेवुन.

----------

आता वातावरणात सनयीचे सुर पाखरांच्या सुरात मिसळुन नाद घुमवु लागले. चौघडे हळु हळु आपला ताल वाढवु लागले. सगळीकडे लगबग सुरु झाली. दिवे लागले, रोषणाई झाली. नवीन पदर उलगडु लागले. अंगण पुन्हा-पुन्हा सजु लागले. दारोदारी मग गेरु झिजला. ती स्वत: रांगोळी घेउन फिरु लागली. आपल्या लांबसडक, नाजुक हाताने अवघड पदर संभाळीत ती दारात चिमुट रांगोळी सांडु लागली.

----------

----------

मी दुरुन पाहिले. ते अंगण, तो दरवाजा, ते घर माझे नव्ह्ते. ग्रीष्म नुकताच सुरु झालेला. गावापासुनचे दूर माझे शेत निपचीत पडलेले, पाखरे कधिची निघुन गेलेली.

भरल्या डोळ्यांनी मी पुन्हा आभाळ शोधायला लागलेलो.



- समीर पाटिल (२७ जानेवारी. २००४)

Wednesday, November 05, 2008

कांदापोहे

आज रविवार! आज निदान दोन प्लेट कांदापोहे खाल्ले नसते तर पुढील हे सर्वकाही लिहुपण शकलो नसतो. यात कांदापोहे हे शक्तिवर्धक वैगरे आहेत असे काही मला सांगायचे नाही. पण कांदापोहे पोटात गेल्याशिवाय पुढील कामास मी मुळी हातच लावत नाही. जसे आपल्या शरीरात कधी-कधी अ, ब, क किंवा ड जीवनसत्वांची कमी होते ना अगदी तशीच माझ्या पोटात कांदापोह्यांची कायमची कमी असते. आणि या सत्वाच्या अभावी रविवारी हि परिस्थिती अगदी माझ्या अशक्तपणाच्या पातळीवर येवुन ठेपते. त्या अर्थाने कांदापोहे हे शक्तिवर्धकच झाले म्हणायचे. नाहीतरी तसा कांदापोह्यांच्या बाबतीत मी मनाने बराच अशक्त आहे. मात्र कोणी काही म्हणोत ह्या कांदापोह्यांमध्ये जादू आहे जादू! मी तर पुढच्या आठवडयाभरची एनर्जी म्हणुनच बघतो ह्या डिशला.

माझे आणि रविवारचे नाते ह्या कांदापोह्यांमुळे जुळले आणि घट्ट झाले. रविवारची सुट्टी जशी आपल्या हक्काची असते ना तसेच रविवारचे कांदापोहे, हा मी माझा हक्क मानलेला आहे. ह्या कांदापोह्यांमुळे जर कोणाची सकाळ प्रसन्न होत असेल तर माझा अख्खा रविवार आणि पुढचा संपूर्ण आठवडा प्रसन्न होवुन जातो. इतर दिवशी ते खाल्ल्याने मला समाधान मिळत नाही असे काहि नाही, पण रविवार तो रविवार. ती सकाळ कांदापोह्यांचीच, इतर दिवशी सकाळी मला खायला काहिही मिळाले किंवा नाही जरी मिळाले तरी चालते पण रविवारी मात्र कांदापोहे हे हवेच. जसा एखादा चातक पक्षी आकाशाकडे डोळे लावुन पावसाची वाट पहात बसतोना अगदी तसाच मीदेखील रविवारी सकाळी किचनकडे नाक लावुन बसलेला असतो. तिथुन दरवळत येणारा कांदापोह्यांचा सुगंध हा माझा त्या दिवसाच्या प्राणवायुचे काम करतो.

तसे पाहता उभ्या भारतात कुठेनाकुठे तुम्हाला वेगवेगळ्या नावाने क्वचित कांदापोह्यांची रुपे पहायला मिळतील पण त्याची चव मात्र आपल्या महाराष्ट्रातच मिळेल. महाराष्ट्राने कांदापोह्यांला नुसती चवच नव्हे तर नाव, रंग आणि मुख्य म्हणजे पुरणपोळीप्रमाणे ओळख दिली. अतिथी देवाला कांदापोह्यांचा हमखास प्रसाद मिळतो तो केवळ या महाराष्ट्रातच. आपल्या महाराष्ट्रात कांदापोह्यांचे विविध प्रकार पहायला मिळतील. कुठे त्यात शेंगदाणे मिळतील तर कुठे ओले वटाणे, वरुन कोथिंबीर किंवा ओल्या खोबरयाचा शिडकावा म्हणजे तर स्वर्ग सुख आहे. कधी मिरचीचा अभाव असेल तर चटणीचा प्रभाव एखादयाला नक्की आवडून जाईल. मुंबई, पुण्यासारख्या शहरातील 'चाट' संस्कृतीचा परिणाम म्हणुन क्वचितप्रसंगी त्यावर फरसाणमधील बारीक शेव शिंपडून मिळेल. आणि जर कुठे नाजुक हाताने लिंबू पिळून मिळाला तर मिसेस यजमानांची तुमच्यावर खास मर्जी आहे असे समजावे. काही ठिकाणी मिळणारा खुसखुशीतपणा तुम्हाला खुशीत आणल्याशिवाय राहणार नाही. अनेकदा काही ठिकाणी कांदयाच्या ऐवजी बटाटा वापरला जाईल पण त्याचे मुळ स्वरुप म्हणजे कांदापोहे हेच.

मला का ते ठावुक नाही पण 'उपवासाला हा पदार्थ चालत नाही' असे म्हणतात. मुळात "उपवासाचे पदार्थ" हा काय प्रकार आहे हे अजुनही मला नीटसे कळालेले नाही, तरीही कांदापोह्यासारख्या राजेशाही प्रकाराला नुसता 'पदार्थ' म्हटलेले मला तसेदेखील आवडणारे नाही. चमच्यातुन घेतलेल्या एक-एक घासाची चव जिभेवर घोळवत तृप्तीचा होकार काढणारया या खानदानी खादयप्रकाराला नुसता 'पदार्थ' म्हणणे म्हणजे अन्यायच झाला. मराठी माणसाने चमच्याने काही खावे आणि त्याने त्याचे पोट भरावे यातच सर्व काहि आले.

आपल्या इथे एक पद्धत प्रचलीत आहे, एखादा उपवर मुलगा किंवा लग्नाला तयार झालेला घोडा म्हणा हवेतर! ज्यावेळी मुलगी बघायला जातो त्यावेळेस मुलीकडची मंडळी हमखास कांदापोहेच करतात. पण त्यावरुन मुलगी पसंत नापसंत करायलाच हवी अशी काही अट नाही. त्यामुळे मी माझ्या बाजुने अजुनही मुलगी पहायला तयार आहे जमल्यास एकटयाने किंवा उपवराकडील मित्रमंडळींबरोबर. अर्थात प्रकरण अंगाशी आले तर लग्नही करण्याची धमक ठेवुन आहे मी. खरेतर मुलाकडील मंडळींनी मुलगी पसंत करणे किंवा मागाहुन नकार कळवणे ह्या प्रकाराचा मी फार मोठा विरोधक आहे पण माझ्यातला कांदापोह्यांचा समर्थक त्याहून वरचढ असल्यामुळे मी नसत्या सांस्कृतिक-विरोधी चळवळी उभारायच्या भानगडीत पडत नाही. कोणी कांदापोहे खायला जात आहे असे समजले कि जाणकारांनी समजुन जावे हा पठ्ठया मुलगी बघायला जात आहे. पण मी देखील कुठल्याही गोष्टींचा पाठपुरावा केल्याशिवाय गप्प बसणारा प्राणी नाही. अशा वेळी त्या मित्राची साथ देणे हे मी माझे सामाजिक कर्तव्य मानतो. शेवटी प्रश्न नुसत्या त्या मुलाच्या आयुष्याचा नसतो तर बशी भरुन वाढलेल्या गरमा-गरम कांदापोह्यांचादेखील असतो.

बरेच वेळा मित्रमंडळींबरोबर हॉटेलमध्ये खाण्याचे प्रसंग येतात. आजही माझ्या काही मराठी मित्रांची झेप वडा-सांबार, मसाला-डोसाच्या पुढे जायला तयार नाही त्यात माझेपण बोट मेनुकार्डावरुन फिरत-फिरत कांदापोह्यांवरच थांबते. त्या अर्थाने खरेतर मी माझे मराठीपण अजुनही जपलेले आहे. अर्थात ज्या हॉटेलात कांदापोहे मिळत नाहीत तिकडे जाणेदेखील मी कटाक्षाने टाळतो. तसे पाहता विकतचे म्हणजे हॉटेलातले आणि घरचे कांदापोहे यात
म्हटले तर काही खास अंतर नाही पण घराघरातील अंतर मिटवण्यास ह्या कांदापोह्यांचा समाजातील वाटा फार मोठा आहे.

पुढे मागे दुर्दैवाने जर मला एकटे रहावे लागले तर कांदापोहे कसे बनवावे हे सुद्धा मी शिकुन घेतलेले आहे. पण त्याहि अगोदर अडचणींच्या प्रसंगी उपयोगी यावे म्हणुन मी आजुबाजुला चार घरात जवळीक जपलेली आहे. अर्थात माझी 'अडचण' ज्यांना माहीत आहे तेच माझे 'सख्खे शेजारी' असा माझा सरळ साधा हिशोब आहे. त्यासाठी मी सुद्धा कधी मिरची, कोथिंबीर, नारळ, पोहे अशा बाजारवस्तू आणुन माझा शेजारधर्म पाळतो. कठीण परिस्थितीत अगदी शेवटचा पर्याय माझ्यासारख्या महाभागांना स्वावलंबनाकडे घेऊन जातो. पण स्वत:च्या हातचे खाण्यात काहीच मजा नाही हो! ती चव पुरुषाच्या हाताला नाही हेच खरे. त्याने नुसता हात पुढे करावा तो गरमा-गरम कांदापोह्यांनी भरलेली बशी पकडण्यासाठीच. पुरुषाच्या सुखाचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हणतात ते उगीच नव्हे.

माझी एक मैत्रीण आहे तिच्या घरी कांदेपोह्यात भाजीतील कोबी पण वापरला जातो हे ऐकल्यापासुन माझी उत्सुकता प्रचंड ताणली गेलेली आहे. एकदा तिच्याही हातचे पोहे खावुन बघायला हवेत. ते आवडले तर गोष्ट पुढे वाढवायला माझी काहीच हरकत नाही. तशी मैत्रिण दिसायला काही वाईटपण नाही. पुढचे अनेक रविवार कांदापोहे पहाण्यासाठी माझे स्वातंत्र्य मी तिच्या पायावर वाहायला एका पायावर तयार आहे. मला वाटते आपल्याकडिल हि पद्धत अशीच पडुन गेली नसणार. हि रुढ रीत पाडणारी ती जी कोणी व्यक्ती होती तिला माझा साष्टांग कुनिर्सात. तसा कांदापोह्यांसाठी मी कुठेहि वाकायला तयार आहे हा लाचारीचा भाग वेगळा.

बाकी कांदापोहे म्हणजे एक अजब मिश्रण आहे त्याबद्दल कितीहि लिहावे तेवढे थोडेच. त्यावर तासनतास लिहिण्यापेक्षा तोच वेळ कांदापोहे खाण्यात खर्ची झाला तर माझा वेळ कारणी लागला असे मला वाटेल. कारण त्यातील गोडी ते खानारयालाच कळते. कधी अगत्याचे कुठे बोलावणे असेल तर तिथे कणाकणात साखर पेरलेली असते तर कधी आगंतुकासारखे कुठे अवतरलात तर क्वचित मीठही साठलेले मिळते. आयुष्यदेखील असेच आहे कांदापोह्यांसारखे, कधी गरम उबदार बनून स्वागत करणारे तर कधी वाट पाहून थंड पडलेले. कधी गोड तर कधी फारच तिखट, कुठे मिठाचा तर कुठे नुसताच खडा. कधी सपक-सपक तर कधी कोणी लिंबू पिळुन मुद्दामहून आंबट केलेले. कधी बशी सोडुन सांडु पाहणारे तर कुठे तळाचा अंदाज पहाताक्षणीच यावा असे दिसणारे. प्रत्येकाची चव जरी थोडी-थोडी वेगळी वाटली तरी त्यातून मिळणारे समाधान हे शेवटी एकच. ते जिथे, जसे, जितके मिळेल तसे प्रत्येकाने घ्यावे आणि कांदापोहे मनापासून खावे.




- समीर पाटिल (१६ जानेवारी. २००४)