कधी कधी आपले विचार म्हणजे शब्दांचे केवळ बुडबुडे असतात किंबहुना आपल्या नकळत ते बऱ्याचदा तसेच असतात. जितके त्या शब्दांचे वजन कमी-जास्त तितकेच त्याचे बुडबुडे लहान-मोठे असतात.
बुडबुडे ह्याचसाठी म्हणतोय कारण त्या शब्दांत साठलेले अनुभव, चिंतन, त्यातील कल्पनाविलास आणि त्याचा अर्थ हे सारे जोपर्यंत एखादी व्यक्ती तो विचार करीत असते किंवा ऐकत असते तोपर्यंतच त्याची मजा असते, त्याचे अस्तित्व असते. एकदा का तो त्या विचारातुन बाहेर पडला कि त्या विचारांचा तो बुडबुडा फुटतो.
असे बऱ्याचदा होते. बरेचजण बराच विचार करतात आणि त्या विचारांना ईतर विचारांच्या फांदया अकारण जोडत जातात. पण त्यांच्या दॄष्टीने एखादया विषयावर चिकटुन राहने म्हणजे इतर बुडबुडयांची मजा हरवुन बसने.
हे रंगी बेरंगी, अनेकविध आकारांचे, विचारांचे बुडबुडे ज्याला काढता आले तो जादुगार बनतो आणि ज्याला ते जमले नाही तो विंगेतला प्रेक्षक बनतो. तिथे बसुन चकित होण्यात आणि हि सारी मजा न्याह्याळण्यात पण एक मजा आहेच, परंतु प्रेक्षक बनुन ते बुडबुडे स्वत:हुन फुटण्याची वाट बघण्यापेक्षा जर लहान बनुन तेच बुडबुडे आपण फोडू लागलो तर जी मजा अनुभवता येईल ती कल्पनातीत असेल.
काय माहित? अशीच फोडा-फोडी करता-करता अजुन काहि नवीन बुडबुडे तयार होतील. कधी ते एकमेकांशी खेळ मांडतील, कधी एकमेकांच्या विरुध्द पळतील तर कधी दोन समविचारी एकमेकांमध्ये विरघळुन जातील. त्यातुनच मग एखादा नवीन परिपक्व विचारांचा बुडबुडा तयार होईल. एखादा खूप उंच उडेल नाहितर एखादया कमजोर विचाराचे तिथेच पाणी-पाणी होईल.
मात्र त्यातले काही खूप वेळ टिकुन राहतील अजुन एका बुडबुडयाची वाट पाहीत.
- समीर पाटिल (२६ जानेवारी. २००४)
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
अप्रतिम!!!
Post a Comment