Friday, February 10, 2006

वाट चुकलेली पाखरे..

वाट चुकलेल्या पाखरांप्रमाणे आज कधी नाही ते मी पार्कात जाऊन बसलेलो. चिल्ली-पिल्ली खेळताना होणारी किलबील मुकाट्याने ऐकत. मी असा का एकटाच इथे, हे विचारणारे तसे कोणीच नव्ह्ते. मलाहि तसे कोणी विचारावे असे त्या क्षणाला वाटत नव्ह्ते. पण येणारा प्रत्येक क्षण माझ्या एकटेपणाची जाणीव करुन देत होता आणी त्याला टाळून मी मात्र येणारया जाणारया प्रत्येकाकडे पाहत बसलेलो.

कुठेतरी तेवढयात काही रंग उडाले आणी बच्चे मंडळी नाचु लागली. सगळे कुतुहलाने पाहू लागले. नेहमीचाच खेळ होता, पण आपापल्या पाखरांचे कौतुक कोणाला नसते? इथे मी एकटाच, मला कोणाचे कसले आलेय कौतुक? मी आपले लक्ष दुसरीकडे वळवले.. पोरे आली आणी धावत पळत निघुन गेली.

मी मग इतरत्र पाहु लागलो. अगदी जिथे मी बसलेलो त्या कोपरयापासून ते थेट पलीकडच्या कुंपणापर्यंत. सगळीकडे आडवी पसरलेली हिरवळ, त्यातुन फ़िरणारे छोटे रस्ते, रस्त्याच्या कडेला बेन्चवर बसलेले काहि वयस्कर मंडळी, चणे विकत फ़िरनारा भैया, काहिजण निद्रेच्या स्वाधिन झालेले, त्यांच्या बाजुला पड्लेले काही कागद न सुटलेल्या शब्द्कोड्यांसहीत. ह्या सगळ्यांकडे तोंड फ़िरवून बसलेले एक दोन नवीन जोडपी आणी बागेच्या अगदी मधोमध उभी असलेली कारंजी, त्यातून उसळणारे पाणी ठिपके ठिपके होवुन उडुन चाललेले आणी बाकिचे पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी परतणारे.

माळ्याने लहान मोठी झाडे कशी अगदि जीवापाड जपलेली. प्रत्येकावरुन त्याने मनासारखी कैची फ़िरवलेली त्याच्याच मनातला आकार देण्याकरिता. विटा-पन कशा अधुन मधुन, पण ओळीत पेरलेल्या. छोटे छोटे त्रिकोणी डोंगरच जणू काहि. पण ती फ़ुलझाडे इकडची नक्कीच नव्हती.. कुठूनतरी फ़िरत फ़िरत येवुन इथे विसावलेली वाटली. खरेतर त्यांना कोणीतरी जबरदस्तीने एकडे पकडून आणल्यासारखी वाटली नाहीतर विदेशातील फ़ुले इथे येवुन का उगाच फ़ुलतील? त्यांनाही त्यांचा देश प्यारा असेलच.. पण त्यांची मैफ़ील मस्त जमुन आलेली. अर्थात कोणीतरी घडवून आणलेली. इतके सगळे रंग एकत्र आलेले पाहुन कोणीही मोहित झालाच पाहिजे, असे रंग.

दोन-चार अशीच चिमुकलि पिवळि-पिवळि फ़ुलपाखरे त्यांच्या रंगान्ना भुललेली. इथे तिथे बसत एकमेकांचाच पाठलाग करणारी. त्यांच्यापैकी एकजन उडत उडत मुद्दामहून किंवा चुकून अगदी माझ्याजवळ आले. मी पटकन खुश झालो.. निसर्गाचा एक तुकडा मझ्याभोवती पिंगा घालत होता. ते अगदी माझ्या कानात शिरु लागले, मग डोक्यावर, मग माझ्या खिशात लपू लागले. मला अगदी हसायला आले. थोडा वेळ मी माझ्याच विचारतून बाहेर आलो, माझे एकटेपण संपवून. तेवढयात ती मूले पळत पळत बाजूने निघुन गेली. त्यांच्या गोंधळात हे पिवळे पान-पण उडून गेले. त्याने माझ्या कानात काय सांगितले असेल त्याचा विचार करतानाच पोरांचा गोंधळ अचानक वाढला. मी पण तिथे वळुन पाहिले, हातात कसल्याश्या जाळ्या घेवुन ती सगळी नाचत होती.

दुरवर आलेली ती फ़ुलझाडे, त्यांना भुलनारी ती फ़ुलपाखरे, त्यांच्या पाठी लागलेली ती मुले, त्यांचा तो खेळ आवडुन कौतुक करनारे त्यांचे ते पालक, आणी सगळे लक्षात येउनही दुर्लक्ष करनारा मी.. म्हटले तर आम्ही सगळे थोडा वेळ एकत्र आलेलो.. म्हटले तर आम्ही सर्वजण आप-आपली वाट चुकलेलो.


-समीर पाटील

1 comment:

Dhananjay Khore said...

ekdam masta samu....! khup divasa nantar kahitari manala shivnare wachle

danny